Nisarga Mitra Mandal Aurangabad

Sunday 19 March, 2023

20 मार्च जागतिक चिमणी दिवस #निसर्ग मित्र मंडळ #किशोर गठडी

 चिमणी (House sparrowIII)

शास्त्रीय नाव :सिकोनिया सिकोनिया

(Passer domesticus)

कुळ(Passeridae)


‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणजे नेहमी दिसणा-या गोष्टींचे खरे महत्त्व जाणवत नाही.असा त्याचा साधारण अर्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण ! वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचेच प्रतीक आहे.

जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. वीज, मोबाईलमधुन येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते.

 हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो . तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात.


माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सुर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते.

भारतात चिमण्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळ गुजरात आणि राजस्थानमध्ये चिमण्यांची संख्या 20 टक्क्यांनी घटली आंध्र तेलंगाना चिमण्यांचे प्रमाण 80 टक्के घटले आह. किनारपट्टी भागात याचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांनी खाली आले आहे .

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

चिमण्या हरवत आहेत. आपल्या परिसरातील चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चिमण्या अदृश्य होण्याची अनेक कारणे आहेत. चिमण्यांना मिळणारे अन्नकण कमी झाले आहेत. पूर्वी इतस्तत पडलेले धान्य निवांतपणे टिपायला चिमण्या यायच्या. आता इतस्तत: पडलेले अन्नकण कमी झाले आहेत आणि निवांत टिपायला घराला अंगण राहिले नाही. चिमण्यांना मिळणाऱ्या अन्नकणांत म्हणजे टिपायच्या दाण्यांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह व विष इतके असते की कित्येक चिमण्या ते  खाऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. चिमण्या झुरळ व इतर उपद्रवी कीटकही खातात, परंतु आज या सर्व कीटकांना विष घालून मारले जाते. मग ते खाऊन चिमण्यांना मरावे लागते.

आपण बांधलेल्या सिमेंटच्या इमारतीमध्ये चिमण्यांना घरटे बांधायला जागा नाही. जागा असेल तरी घरटे बांधायचे साहित्य चिमण्यांना परिसरात उपलब्ध नाही. त्यामुळे बेघर होणाऱ्या चिमण्यांना मदत करण्यासाठी भूतदयेने किंवा पर्यावरणीय पक्षीप्रेमातून आपण ही घरटी विकत घेऊन किंवा स्वतः तयार आपल्या घराच्या दर्शनी भागावर लावून आपले पर्यावरणप्रेम जाहीर करत असतो परंतू याचा उपयोग सहसा होत नाही

चिमणीसारख्या पक्ष्यांच्या जीवनक्रमात जन्म- जीवनसंघर्ष – पुनरुत्पादन हे सर्व नैसर्गिकप्रशिक्षण असते. त्यांना आपल्या अन्नाकरिता परिश्रम करावे लागतात. त्यांना हे अन्न सहज मिळू लागले तर तो संघर्ष चिमणी विसरेल. सकाळी उठून इतस्तत: उडून आपल्याला आवश्यक अन्न मिळवणे हे त्यांचे जीवनकार्य आहे.

जीवनसंघर्षांत चिमण्यांना योग्य अन्न शोधायची कला शिकावी लागेल. तसेच पर्यायी घरटय़ाचे साहित्य शोधावे लागेल. घरटय़ाच्या रचनेत बदल होईल, कदाचित अजून काही वेगळा बदल होईल. पण सर्वस्वी तो बदल त्या पक्ष्यांच्या अंतप्रेरणेतून होईल. आणि तो बदल शाश्वत असेल. आपण कृत्रिम घरटे पुरवून त्यांना अनैसर्गिकपर्याय पुरवत आहोत.



किशोर गठडी

सचिव निसर्ग मित्र मंडळ

No comments: